राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र २०४७ संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

10

मुंबई : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक विद्यापींठात डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, उच्च शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, पायाभूत सुविधा, विद्यापीठ रँकिंगची सध्याची असलेली स्थिती याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय पातळीवर विद्यापींठाचे रँकिंग वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करुन कालबद्ध नियोजन करावे. या कृती आराखड्याला अधिक गती देण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड तयार करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.

जागतिक स्पर्धेच्या युगात शैक्षणिक गुणवत्ता आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्राशी करार, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम तयार करून रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. खासगी विद्यापीठात नवनवीन कल्पना/ अभ्यासक्रम पुढे येत आहेत तसे सार्वजनिक विद्यापीठांनी गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

बैठकीत खालील मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली :-

१. एनआयआरएफ मध्ये सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे
२. महाराष्ट्राला जागतिक शिक्षणाचे गंतव्यस्थान बनवणेःराज्याबाहेर जाणारे विद्यार्थी रोखणे आणि एनआरआय व परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे
३. उच्च-टीआरएल(टेक्नॉलॉजी रेडीनेस लेव्हल)संशोधन आणि व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान पेटंट्स निर्माण करणे
४. महाविद्यालयांमधील शिक्षणाची पातळी उंचावणे आणि विद्यार्थ्यांना जागतिक रोजगारासाठी तयार करणे.
५. अभ्यासक्रमांना भावी रोजगार बाजारातील कौशल्ये आणि ज्ञानाच्या मागण्यांशी संरेखित करणे.
६. जागतिक विद्यापीठांशी सहयोगासाठी विद्यापीठांच्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे.

या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे आणि राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरू उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.