उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पवित्रम्’ मोबाईल ॲपचे लोकार्पण संपन्न
पुणे : पवित्रम् फाउंडेशनतर्फे हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका सामायिक व्यासपीठावर आणण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘पवित्रम्’ मोबाईल ॲपचे लोकार्पण आज श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते झाले. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून फाऊंडेशनच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
समाजातील उद्योजक आणि ग्राहक यांच्यात विश्वास, पारदर्शकता आणि सशक्त व्यावसायिक नेटवर्क निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पवित्रम् फाऊंडेशन या संस्थेने हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी ‘पवित्रम्’ हे नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून हिंदू व्यापारी व ग्राहकांना परस्परांशी जोडले जाऊन स्वदेशी आणि धार्मिक मूल्यांवर आधारित व्यापार प्रणाली मजबूत करण्यास मदत होणार आहे. या नव्या मोबाईल ॲप द्वारे व्यापारी आपली उत्पादने व सेवा हिंदू ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवू शकतील. ग्राहकांना देखील विश्वासार्ह हिंदू व्यावसायिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी उद्योजक कृष्णकुमार गोयल, फाउंडेशनचे अध्यक्ष सुबोध शहा, तसेच तुषार कुलकर्णी, शशांक मेंगडे, सारंग देव, राजेश तोळबंदे, आशिष कांटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.