संघकार्याला निष्ठेने वाहून घेतलेले आणि सहकार चळवळीला वैचारिक बळ देणारे वसंत नारायण देवधर अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तसेच सहकार भारतीचे संस्थापक सचिव श्री. वसंत नारायण देवधर यांचे नुकतेच निधन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले व देवधरजींना श्रद्धांजली अर्पण केली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे, संघकार्याला निष्ठेने वाहून घेतलेले आणि सहकार चळवळीला वैचारिक बळ देणारे देवधरजी अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. या कठीण प्रसंगी संपूर्ण संघ परिवार देवधर कुटुंबियांसोबत ठामपणे उभा असल्याचे पाटील यांनी म्हटले.
सहकार भारतीचे संस्थापक सरचिटणीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, जनसेवा सहकारी बँकेचे पहिले कार्यकारी संचालक आणि अनेक नागरी सहकारी बँकांचे सल्लागार, मार्गदर्शक वसंत नारायण देवधर (वय ९१) यांचे १९ नोव्हेंबर रोजी राहत्या घरी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. महाराष्ट्रातील अनेक बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम घेतले. संघाच्या घोष वादनामध्ये देखील त्यांचा विशेष हातखंडा होता. घोषाच्या भारतीय रचना बनवण्यात याव्यात यासाठी ते आग्रही होते.