अथॅलेटिक्स खेळाडू विकास आनंद खोडके याच्या कठोर परिश्रमाला, अविचल समर्पणाला आणि न थकणाऱ्या चिकाटीला मनापासून सलाम – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारा,ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील अथॅलेटिक्स खेळाडू, विकास आनंद खोडके, सध्या न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे एम.ए. भाग एक मध्ये शिकत आहे. या कोल्हापुरच्या सुपुत्राने ५ वे Khelo India University Games (जयपूर, राजस्थान) येथे 110 मीटर हर्डल्समध्ये रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरचा मान अधिक उंचावला आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सोशल साईट्सवर पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, विकास, तुझे मनःपूर्वक अभिनंदन! तुझ्या कठोर परिश्रमाला, अविचल समर्पणाला आणि न थकणाऱ्या चिकाटीला मनापासून सलाम. तू व्यक्त केलेल्या प्रेमळ शब्दांबद्दल मी कृतज्ञ आहे. तुझ्या यशाच्या प्रवासात माझा छोटासा सहभाग ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे पाटील यांनी म्हटले.
अशीच जिद्द, मेहनत आणि लक्ष केंद्रित ठेवून पुढे वाटचाल कर, आमचे मार्गदर्शन आणि पाठिंबा सदैव तुझ्या पाठीशी असेल. भविष्यात सुवर्णाच्या शिखरावर तू नक्कीच झेप घेशील, याची मला पूर्ण खात्री आहे. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद आणि अनंत शुभेच्छा!! अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.