बालगृहातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून स्पोर्ट्स किट, मुलींसाठी हुडी आणि लायब्ररी कपाट प्रदान
सांगली : सांगली येथील दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृहातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून स्पोर्ट्स किट, मुलींसाठी हुडी आणि लायब्ररी कपाट प्रदान करण्यात आले.
या वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव देखील उपस्थित होते.
पालकमंत्री हेल्पलाईन कक्षाच्यावतीने दादुकाका भिडे मुलांचे निरीक्षण गृह व बालगृह, सांगली येथील मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. विवेकानंद वैद्यकीन प्रतिष्ठान संचलित विवेकानंद रुग्णालय, बामणोली यांच्या सहकार्याने यावेळी बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणी करून आवश्यक त्या मुलांना औषधेही देण्यात आली.
यावेळी अशोक काकडे म्हणाले, आयुष्य फार सुंदर असते. फक्त एक दृष्टिकोन असावा लागतो तो दृष्टिकोन योग्य असेल तर आपण आपल्या पायावर उभे राहून आयुष्यामध्ये खूप आनंद मिळवू शकतो. आनंद मिळवणे हेच खऱ्या अर्थाने अयुष्याला एक फलद्रुप करण्याचा मार्ग आहे. पालकमंत्री यांच्याकडून भेटस्वरूपात ज्या वस्तू मिळालेल्या आहेत, त्या जपून वापरून त्याचा उपभोग घ्यावा, असे ते म्हणाले. आपल्याला आयुष्यामध्ये आपली कर्तव्ये पार पाडायची आहेत, ती आपल्या शरीराच्या माध्यमातूनच आपल्याला पार पाडावी लागतील. यासाठी शरीर निरोगी असलंच पाहिजे. आजारी पडल्यानंतर आपल्याला आरोग्याची किंमत कळते. यासाठी आपले आरोग्य जपून, सांभाळून ठेवावे, असा सल्ला देताना त्यांनी यावेळी बालगृहातील मुलांची आरोग्य तपासणी केल्याबद्दल विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित विवेकानंद रुग्णालय बामणोलीचे अभिनंदन केले.