एमआयडीसीत अद्ययावत सीसीटीव्हीचा प्रस्ताव सादर करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

8

सांगली : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा शुक्रवारी आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षेस पोलीस प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे. गुन्हेगारांवर नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक तेथे कठोर पावले उचलावीत. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा धाक निर्माण करावा. या अनुषंगाने सांगली शहरातील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रस्ताव राज्य स्तरावर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. तोपर्यंत एमआयडीसी क्षेत्रातील वाढलेली गुन्हेगारी लक्षात घेऊन त्यावर नियंत्रणासाठी अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणेबाबतचा तात्काळ आराखडा बनवून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्याबाबत सूचना त्यांनी यावेळी पाटील यांनी दिल्या.

पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, चंद्रकांत पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, पोलीस निरीक्षक सर्वश्री सतीश शिंदे, संजीव झाडे, विशाल टकले आणि संजय मोरे आदि उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शांतता, सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना आखाव्यात. त्यासाठी मॉडेल विकसीत करा. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी लाईट, अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, गस्त वाढवावी. कार्यवाही दरम्यान काही अडीअडचणी येत असतील तर त्या मांडाव्यात त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू. अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने विविध विभागांच्या समन्वयाने काम केले त्यामुळे अमली पदार्थ तस्करांवर वचक बसण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.