कोल्हापूरची सुकन्या आणि प्रतिभावान खेळाडू ऐश्वर्या दयानंद जाधव हिने मिळवलेला विजय हा संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा अभिमान वाढवणारा – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे येथे झालेल्या लॉन टेनिस ज्युनिअर ग्रँड स्लॅम स्पर्धेत डबल्समध्ये कोल्हापूरची सुकन्या आणि प्रतिभावान खेळाडू ऐश्वर्या दयानंद जाधव हिने विजय मिळवला आहे. तिच्या या कामगिरीबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. ऐश्वर्याने मिळवलेला विजय हा संपूर्ण जिल्ह्याचा आणि राज्याचा अभिमान वाढवणारा आहे, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ऐश्वर्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या मेहनतीला आणि उज्ज्वल करिअरला पुढील वाटचालीत आमचा सदैव संपूर्ण पाठींबा राहील. या विजयानंतर तिच्या जागतिक क्रमवारीतही सुधारणा होणार असून, तिच्यासाठी नवी दारे उघडली जातील. ती अशीच उंच भरारी घेत राहो आणि जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत नवे शिखर गाठो, हीच सदिच्छा!, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
ऐश्वर्या दयानंद जाधव हिने वयाच्या १४ व्या वर्षी विम्बल्डन ज्युनियर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले, एशियन टेनिस फेडरेशनने निवडलेल्या आशियाई संघाचा ती भाग होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी चांगली कामगिरी करून टेनिस क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या जाधवने अल्पावधीत राज्य- राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी घोडदौड करत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे.