मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ हे पुस्तक संविधानाचे मूल्य, लोकशाहीची बळकटी आणि जनजागृती यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार – मंत्री चंद्रकांत पाटील

24

नागपूर :भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर 26 मार्च 2025 रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन येथे प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्यात आले आहे.

पुस्तक प्रकाशनप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळ व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

संविधानाचे मूल्य, लोकशाहीची बळकटी आणि जनजागृती यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात आहे. संविधानाने समाजाला, राष्ट्राला जोडण्याचे काम केले. सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

राजभवनचे नामकरण लोकभवन झाले आहे, याचा आनंद आहे. आज भारत जगातील दुसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे आपला देश आता वेगाने विकसित होत आहे. संविधानातील बारकावे या पुस्तकातून जाणून घेता येईल. इतर भाषेतही या पुस्तकाचा अनुवाद व्हावा, असे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले.

भारतीय संविधान हे जगातील एक सर्वोत्तम संविधान आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा विविध संस्थानांमध्ये विभाजित होता. देशात सांस्कृतिक ऐक्य होते, मात्र राजकीय ऐक्य नव्हते. त्यामुळे सर्वांना एकत्र करत सर्वांगीण विचार करून संविधान तयार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मूल्य जपणाऱ्या विविध देशाच्या लोकशाहीचा अभ्यास केला, आणि आपल्या देशातील शाश्वत मूल्यांवर आधारित संविधान निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुस्तक प्रकाशनप्रसंगी म्हणाले.

संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली. संविधानिक व्यवस्था आपल्याकडे कुणीही केंद्रीत करू शकत नाही. देशातील अनेक खटल्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संसद आणि न्यायालयाचे अधिकार परिभाषित केले आहेत. पुस्तक वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस देखील भारताचे संविधान व त्याची मूल्ये समजू शकेल, असे ते म्हणाले. यापूर्वी ‘बजेट कसे असावे’ हे पुस्तक अतिशय सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. संविधान हे सोपे आहे, क्लिष्ट नाही हे सांगण्याचा पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला. आता ते पुस्तक स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचा आनंद असल्याचे फडणवीस पुढे म्हणाले.

संविधानाची माहिती अत्यंत सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणावर आधारित हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत संविधान सर्वांपर्यंत पोहोचवेल. विधिमंडळाची गौरवशाली परंपरा आहे. ही परंपरा अनेक वर्षापासून जपण्यात आली आहे. अनेक देशांकडे आपआपले संविधान आहे. मात्र आपले संविधान हे समाजाचा सर्वागीण विचार करणारे आहे. या पुस्तकाचा अनुवाद इतर भाषेतही व्हावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.