मेट्रो आता थेट ग्रामीण भागातही पोहोचणार… पुण्याच्या विस्ताराला महायुतीकडून बळ! – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणं म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. देशाच्या कानकोऱ्यातून आणि जगभरातूनही शिक्षण, नोकरीसाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पुण्यातील वाहतूक हा एक चिंतेचा विषय ठरला होता. आता महायुती सरकारनं त्यावर मेट्रोचा उपाय शोधला आहे. आता मेट्रो थेट पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोहोचणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
पुण्यात सुरू झालेल्या मेट्रो सेवेला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे आता मेट्रो थेट पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोहोचणार आहे. सोलापूर रस्त्यावर प्रस्तावित हडपसर ते यवत उन्नत मार्ग भैरोबा नाल्यापासून सुरू करावा, हा मार्ग तयार करताना त्यावर ‘मेट्रो’साठी मार्गाचीही तरतूद करावी, असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा निर्णय असल्याचे मत मंत्री चंद्रकांत पाटील यतानी व्यक्त केले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे पाटील यांनी आभार मानले.
सोलापूर रस्त्यावरील हडपसर ते यवत असा होणारा उन्नत मार्ग हडपसरपासून न करता भैरोबा नाल्यापासून सुरू करण्यात यावा; तसेच हा मार्ग तयार करताना त्यावर मेट्रोमार्गाचीही तरतूद करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधांच्या बैठकीत दिले. फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास सरकारचे प्राधान्य आहे. पुणे-नगर रस्त्यावरही उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. तेथेही मेट्रोचा मार्ग भविष्यात तयार करावा लागणार आहे. महामेट्रोकडूनच पालिकाहद्दीतील उन्नत मार्ग बांधण्यात यावा, याबाबतची तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुणे ते यवत हा मार्ग तयार करताना मेट्रो मार्गाचा त्यात अंतर्भाव करण्यात यावा, असे फडणवीस यांनी म्हटले.