राष्ट्रपती भवनात आता परमवीर चक्र विजेत्यांचा गौरव, ब्रिटिश खुणा पुसून ‘परमवीर दीर्घा’ साकार!… हा निर्णय आपल्या शूर वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा – मंत्री चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली : भारताने गुलामीची मानसिकता झुगारून देण्याच्या दिशेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राष्ट्रपती भवनातील गॅलरीतून ब्रिटिशकालीन सैनिकांची चित्रे हटवून आता तिथे भारताच्या २१ परमवीर चक्र विजेत्यांची चित्रे ‘परमवीर दीर्घा’मध्ये दिमाखात लावण्यात आली आहेत. अंदमान-निकोबारमधील बेटांनाही या वीरपुत्रांची नावे देऊन त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, दीर्घकाळ राष्ट्रपती भवनातील गॅलरीत ब्रिटिश काळातील सैनिकांची चित्रे होती. आज त्यांच्या जागी भारताच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचे प्रतीक असलेल्या परमवीर चक्र विजेत्यांची चित्रे अभिमानाने प्रदर्शित करण्यात आली आहेत. राष्ट्रपती भवनातील “परमवीर दीर्घा” ही गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती आणि नवचेतना जपणाऱ्या भारताच्या बदलत्या ओळखीचे प्रभावी प्रतीक आहे. अंदमान–निकोबार बेटसमूहातील अनेक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्याचा निर्णयही आपल्या शूर वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती भवनात नव्याने साकारलेली ही “परमवीर दीर्घा” केवळ एक दालन नसून, ती भारताच्या बदलत्या ओळखीचे प्रतीक आहे. ज्या सैनिकांनी देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या पराक्रमाची गाथा आता राष्ट्रपती भवनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणार आहे.केवळ राष्ट्रपती भवनच नव्हे, तर केंद्र सरकारने अंदमान-निकोबार बेटसमूहातील अनेक बेटांना देखील परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत.