मोदी सरकारचा मोठा दिलासा: पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार

110

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपयांवरून ३ रुपयांपर्यंत, तर डिझेलवरील शुल्कात १० रुपयांची कपात करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

सध्या आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. आफ्रिका आणि आशियाच्या नैऋत्य भागात इंधन ५० टक्क्यांनी महागले असून, उत्तर अमेरिका (३०%) आणि युरोपातही (२०%) मोठी दरवाढ झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत भारतीय नागरिकांना महागाईची झळ बसू नये, यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात सवलत देण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

या निर्णयावर भाष्य करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशासमोर कोणताही आर्थिक किंवा पेट्रोलियम पदार्थांचा पेचप्रसंग नाही, हा सकारात्मक संदेश जगाला गेला आहे. मोदीजी नेहमीच देशवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, याची ही प्रचिती आहे. भारतवासी या निर्णयाबद्दल त्यांचे सदैव ऋणी राहतील.”

इंधनाचे दर कमी झाल्यामुळे वाहतूक खर्च घटून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.