जागतिक बुद्धिबळात भारताचा डंका! अर्जुन एरिगैसीने जिंकले ‘वर्ल्ड ब्लिट्झ’मध्ये कांस्यपदक; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

22

दोहा : दोहा येथे पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या FIDE वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत (FIDE World Blitz Chess Championship 2026) भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याने ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. या जागतिक यशाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्जुनचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्याचा गौरव केला आहे.

जगातील दिग्गज बुद्धिबळपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत अर्जुनने आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि वेगवान निर्णयक्षमतेचा परिचय दिला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत कांस्यपदक जिंकून त्याने भारताचा तिरंगा जागतिक पटलावर मानाने उंचावला आहे. भारतासाठी हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.

अर्जुनच्या यशाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, अर्जुन एरिगैसीची ही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्याची जिद्द, सातत्यपूर्ण मेहनत आणि खेळाप्रती असलेले समर्पण यामुळेच हे यश साध्य झाले आहे. अर्जुनने मिळवलेल्या या विजयामुळे भारतातील लाखो बुद्धिबळप्रेमींना नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी काळात त्याच्याकडून अजून अनेक सुवर्णक्षण घडावेत, हीच सदिच्छा.

गेल्या काही वर्षांत भारतीय ग्रँडमास्टर्सनी जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण केले आहे. अर्जुन एरिगैसीने मिळवलेले हे पदक भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील वाढत्या ताकदीचे प्रतीक आहे. अर्जुनवर सध्या क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.