मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथे भाजपा महायुतीचा जाहीरनामा प्रकाशन सोहळा संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ते २०३० च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या महायुतीचा जाहीरनामा प्रकाशन कार्यक्रम शुक्रवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, वाहतूक, रोजगार आणि सुशासन यांना केंद्रस्थानी ठेवून महायुतीचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
याप्रसंगी आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळ कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, मा.आ. जयश्रीताई जाधव,भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप कोल्हापूर महानगर अध्यक्ष विजय जाधव शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय बलुगडे, कृष्णराज महाडिक, मा. नगरसेवक प्रताप शिरोडकर व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जनतेच्या अपेक्षा, विकासाचा ठोस आराखडा आणि समृद्ध महाराष्ट्राचे स्पष्ट व्हिजन मांडणारा हा जाहीरनामा म्हणजे येणाऱ्या काळातील सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख शासनाचा निर्धार आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
खासदार धनंजय महाडिक यावेळी म्हणाले, आगामी पाच वर्षांत कोल्हापूरला एक प्रगत, स्वच्छ आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. ‘विकासाची हीच ती वेळ’ हा विश्वास बाळगून, आम्ही कोल्हापूरच्या तमाम जनतेला विश्वास देतो की, या जाहीरनाम्यातील प्रत्येक संकल्प पूर्ण करून शहराच्या विकासाला एक नवी दिशा देऊ. कोल्हापूरच्या सन्मानासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सदैव कटिबद्ध आहे!
हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा पाऊस नसून, कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी तयार केलेला एक ठोस कृती आराखडा आहे. या कर्तव्यनाम्यामध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, स्वच्छता, सुलभ वाहतूक, रोजगार निर्मिती आणि पारदर्शक सुशासन या महत्त्वाच्या घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शहराची ऐतिहासिक ओळख जपत असतानाच, येथील कला, क्रीडा, शिक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यावर आमचा विशेष भर असेल. विशेषतः महिलांची सुरक्षा, अंतर्गत रस्त्यांचे जाळे सक्षमीकरण आणि वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आधुनिक उपाययोजना राबवण्यास महायुतीचे प्राधान्य असेल.