मिसळीचा आस्वाद आणि विकासाच्या गप्पा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला कोल्हापूरकरांशी थेट संवाद

15

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचे ठोस व्हिजन मांडण्यासाठी आणि थेट कोल्हापूरकरांशी संवाद साधण्यासाठी भाजपा महायुतीच्या वतीने ‘मिसळ कट्टा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या विकासासाठीची दीर्घकालीन दिशा मांडत, दरवर्षी भेडसावणाऱ्या महापुरासारख्या गंभीर समस्यांवरील कायमस्वरूपी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

अभिनेते स्वप्नील राजशेखर व कृष्णराज महाडीक यांनी कोल्हापूर येथे ‘देवाभाऊ! मिसळ कट्टा: कोल्हापूरकरांचा संवाद देवाभाऊंशी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी येथील मिसळीचा आस्वाद घेत, ठसकेदार गप्पांच्या माध्यमातून कोल्हापूरकरांच्या स्वप्नांचा वेध घेणारे, उद्याच्या कोल्हापूरचे चित्र मांडले.

फडणवीस यावेळी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, उद्योग आणि शिक्षणाची जी पायाभरणी या कोल्हापूरमध्ये केली, तोच वारसा पुढे नेत आधुनिक कोल्हापूर उभे आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शहरांमधील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. याच अनुषंगाने कोल्हापूरमध्ये रस्ते, भूयारी गटारे, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय उपाययोजना यावर आम्ही भर देत आहोत. रंकाळा तलावाचे सुशोभीकरण, उड्डाणपूल आणि रिंग रोडमुळे कोल्हापूरमधील जनजीव अधिक सुखकर करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले, पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखणे ही आमची प्राथमिकता आहे. STP, भूयारी गटारे आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या माध्यमातून पंचगंगेला निर्मळ करण्याचा आराखडा अंमलात येत आहे. कोल्हापूर-सांगली भागातील पूरप्रश्नावर वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने उपाययोजना राबवल्या जात असून, पुराचे पाणी डायव्हर्जन कॅनालद्वारे उजनीमार्गे मराठवाड्यात नेण्याचे काम सुरू आहे. यामुळे पूरग्रस्त भागाचे संरक्षण आणि दुष्काळी भागांना पाणी, या दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत.

मुंबई-बंगळुरू कॉरिडोरमुळे कोल्हापूरमध्ये औद्योगिक आणि IT इकोसिस्टिम उभी राहत आहे. येथील विमानतळाचा विस्तार, क्रीडाक्षेत्रासाठी जागतिक दर्जाचे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर, स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सेंटर्स या सगळ्यांतून कोल्हापूरचे भविष्य अधिक उज्ज्वल होत आहे, असे फडणवीस म्हणले तसेच, येत्या 15 तारखेला कोल्हापूरकरांनी महायुतीची काळजी घ्यावी; पुढची 5 वर्षे आम्ही कोल्हापूरची काळजी घेऊ असे आवाहन देखील त्यांनी यावेळी दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.