देशाच्या संरक्षणासाठी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे योगदान अमूल्य; पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला वीर पत्नींचा सन्मान
पुणे : पुणे येथे १० व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या गौरवपूर्ण कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन माजी सैनिक तसेच वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाच्या संरक्षणासाठी निःस्वार्थपणे सेवा बजावणारे माजी सैनिक, वीर पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांचे त्याग, धैर्य व राष्ट्रउभारणीतील अमूल्य योगदान याबद्दल संपूर्ण देश कायम ऋणी आहे. १० व्या सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त सर्व माजी सैनिक, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे (NDA) कमांडंट व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी, दक्षिण-पश्चिम हवाई दलाचे वरिष्ठ प्रशासन प्रभारी एअर व्हाईस मार्शल गुरजोत सिंग भुल्लर, पुणे वायुसेना तळाचे एअर ऑफिसर कमांडिंग (AOC) एअर कमोडोर सतबीर सिंग राय यांच्यासह सर्व श्रेणीतील अधिकारी, जवान, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.