हा गुलाल जनतेच्या विश्वासाचा आहे, हा विजय पुण्याच्या प्रगतीचा आहे! – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयाचा जल्लोष आज पुणे भाजपा कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. हा गुलाल जनतेच्या विश्वासाचा असून हा विजय पुण्याच्या शाश्वत प्रगतीचा आहे, अशा भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पुणे भाजपा कार्यालयात सर्व विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यभरातील महानगरपालिकांचे निकाल हे महायुती सरकारच्या जनहितार्थ कामांना जनतेने दिलेली पोचपावतीच आहे. मतदारांचा कौल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला पूर्ण खात्री होतीच.

मंत्री पाटील यांनी या विजयाचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष उल्लेख केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या शिलेदारांनी हा विजय साकार केल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबतची ही महायुती महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या विजयामुळे पुणे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण असून, विजयी उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. पुणेकरांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करण्यासाठी आम्ही पुण्याच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेऊ, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,” पुणेकरांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे. पुणेकर जनता ही आमच्या सोबत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. कोणीही कितीही काहीही केलं. कितीही टीका केली तरी पुणेकर कोणालाही महत्त्व न देता विकासाला महत्त्व देत असतात. आम्ही ही निवडणूक विकासावर तसेच पुण्याच्या भवितव्यासाठी लढवली होती. गेल्या पाच ते सहा निवडणुकीत पुणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला. या निवडणुकीतदेखील पुणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला, असे मोहोळ म्हणाले.