पुणे जिल्हा परिषद निवडणूक : भाजपा-शिवसेना युतीची जागावाटपावर चर्चा; मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत विजयाची रणनीती निश्चित
पुणे : आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी ही निवडणूक महायुती म्हणून एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शनिवारी पुण्यात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुणे जिल्हा परिषद निवडणूक महायुती म्हणून पूर्ण ताकदीने लढण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही पक्षांमधील समन्वय वाढवणे, जागावाटपाचे नेमके निकष ठरवणे आणि प्रचाराची पुढील रणनीती आखणे यावर नेत्यांनी सविस्तर विचारमंथन केले. या चर्चेमुळे जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीला गती मिळणार असून, महायुतीच्या रणनीतीला अंतिम रूप देण्यासाठी पुढील बैठका होण्याची शक्यता आहे.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री व पुणे जिल्ह्याचे भाजपा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, राजेश पांडे तसेच आमदार राहुल कुल उपस्थित होते.