शिरूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे कुटुंबीय आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्वागत
पुणे : पुणे येथे शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, तसेच शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या सर्वांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करत पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा कंद, दौंडचे आमदार राहुल कुल, जयश्रीताई पलांडे, उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे माजी आमदार संजय जगताप प्रवीण भैया माने, धर्मेंद्र खांडरे यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र गावडे हे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. राजेंद्र गावडे यांचा भाजप प्रवेश हा शिरूर तालुक्यातील राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मोठ्या कार्यकर्ता वर्गासह गावडे भाजपमध्ये दाखल होत असल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. पक्षात निष्ठेला योग्य स्थान मिळत नसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला, असे मत राजेंद्र गावडे यांनी व्यक्त केले.