‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या दुसऱ्या टप्प्याचा दिमाखदार प्रारंभ… मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती

14

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गसंपन्न वारशाचे जागतिक पातळीवर दर्शन घडवणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याचा आज मोठ्या उत्साहात दिमाखदार प्रारंभ झाला. कॅम्प येथील लेडीज क्लब परिसरातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून या टप्प्याला सुरुवात करण्यात आली.

यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुण्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, “या स्पर्धेचे आयोजन करताना ते एक स्वप्न वाटत होते. मात्र उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयामुळे हे भव्य आयोजन यशस्वी झाले आहे. या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव जगभर पोहोचले असून सायकलिंगच्या इतिहासात पुण्याची ठळक नोंद झाली आहे. ज्या प्रकारे पुणे पुस्तक महोत्सवाने विविध विश्वविक्रम प्रस्थापित केले, त्याचप्रमाणे या स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे पुण्याचा लौकीक वाढेलच, शिवाय जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेलाही चालना मिळेल. जगभरातील नागरिकांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले असून विविध देशांतील खेळाडू आणि पर्यटक पुण्यात दाखल होत असल्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे औद्योगिक तसेच सांस्कृतिक शहर आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधिक भक्कम होणार आहे. यामुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळेलच, तसेच नव्या पिढीतील सायकलपटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यासाठी प्रेरणा मिळेल.

ग्रामीण आणि डोंगराळ भागातूनही स्पर्धेला प्रतिसाद

दुपारी १.३० वाजता सुरू झालेला हा दुसरा टप्पा एकूण १०९.१५ किलोमीटर अंतराचा होता. पुणे शहर, पुरंदर, राजगड आणि हवेली या चार तालुक्यांतील ऐतिहासिक, ग्रामीण आणि डोंगराळ भागांतून जाणारा हा आव्हानात्मक मार्ग असल्याने देश-विदेशातील नामवंत सायकलपटूंनी या मार्गावर आपली ताकद, तंत्र आणि सहनशक्तीचे दर्शन घडवले.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्यापासून पुढे वेल्हे व भोर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीतून सायकलपटूंनी दमदार रपेट करत सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरात हा थरारक टप्पा संपविला. चढ-उतार, घाटवाटा आणि लांब पल्ल्यामुळे हा टप्पा सायकलपटूंसाठी शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा ठरला.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.