देशाला, जिल्ह्याला वैभवशाली, संपन्न बनविण्यासाठी सर्वजण कटिबद्ध होऊया – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली, २६ जानेवारी २६ : प्रजासत्ताक दिनी देशाला तसेच जिल्ह्याला वैभवशाली आणि संपन्न बनविण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर त्यांनी सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक सागर गवते, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे ही एक मोठी जबाबदारी होती. स्वातंत्र्यापूर्वी राजघराणेशाही होती. स्वातंत्र्यानंतर लोकांचे लोकांसाठी राज्य आले. या अनुषंगाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. महिलेला पुरूषांबरोबरीचे स्थान देणे या मूळ भारतीय गाभ्याप्रमाणे या समितीमध्ये 5 महिला सदस्य होत्या, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करून समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला. तर संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस “भारतीय प्रजासत्ताक दिन” म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक कारण होते. 26 जानेवारी 1930 रोजी आपण लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करूनच संविधान अंमलात आणण्याचा दिवस ठरवण्यात आला, असे ते म्हणाले.
भारतीय राज्यघटनेमध्ये अशी रचना करण्यात आली की भविष्यात त्यात बदल करावा लागणार नाही. राज्यघटना सोप्या शब्दात मांडलेली असून, देशाच्या एकात्मतेसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना त्यात करण्यात आल्या आहेत, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्यांचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस आहे. अधिकारांसोबतच कर्तव्यांचे आणि कायद्याचे आदरपूर्वक पालन करणे, सार्वजनिक शिस्त राखणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्यामुळेच आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करताना भावी पिढी नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेले थोर क्रांतिकारक, शूरवीर, शहीद, महापुरूष, स्वातंत्र्यसैनिक, देशभक्त, समाजसुधारक, शहीद जवान, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांना अभिवादन करून उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुख्य शासकीय समारंभात प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर चंद्रकांत पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. यावेळी विविध पथक प्रमुखांनी त्यांना मानवंदना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा दल, अग्निशमन दल, पोलीस दल बँड पथक, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्ह्यामध्ये विविध शाळांमध्ये विद्यार्थीनीना कराटे प्रशिक्षण दिले जाते, याचे प्रात्यक्षिक आज सादर करण्यात आले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे, बाळासाहेब माळी यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. तसेच, विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हे सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे कार्यरत असताना शहीद झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री. भगत यांचे वडील शंकर भगत यांना 1 कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
दिनांक 23 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सोलापूर येथील महापुराच्या वेळी सांगली जिल्ह्यातील स्वयंस्फूर्त, स्वयंसेवक, आपदा मित्र यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल दत्ता पाटील, महेश कुमारमठ व कैलास वडर यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
शिवछत्रपती विद्यालय शिराळा शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी बालाजी पाटील, (वय वर्षे 11) याने उपवळे येथे त्याची सख्खी बहीण स्वरांजली (वय 9 वर्षे) हिला बिबट्याच्या तावडीतून वाचवल्याबद्दल तसेच परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेला विद्यार्थी प्रणव भोसले (अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी) याचा सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील निखील साळुंखे व नेहा ठोंबरे, राकेश दड्डणवार, राधिका पेंडसे, यांचा तसेच, नॅशनल इन्स्टिट्युट फॉर कम्युनिटी डेव्हलपमेंट ॲन्ड रिसर्च सेंटर सांगली, युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली, या संस्थांचा सहाय्यक कृषि अधिकारी सर्वश्री गोरख जरे, गजानन अजेटराव, उमेश साळे तसेच विजया राठोड, जिल्हा संसाधन व्यक्ती राहूल ठोंबरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस विभागाकडील विविध कामगिरीमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक सर्वश्री सतीश शिंदे, संजीव झाडे व मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, संदीप शिंदे, त. अधिकारी संतोष यादव व पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कोळेकर यांचाही सन्मान करण्यात आला.