सांगली जिल्हा परिषदेसाठी भाजप-जनसुराज्य पक्ष सज्ज! संगमेश्वराच्या आशीर्वादाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हरिपूरमध्ये प्रचाराचा श्रीगणेशा
सांगली (हरिपूर) : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ सोमवारी उत्साहात करण्यात आला. हरिपूर येथील ग्रामदैवत श्री संगमेश्वराच्या चरणी श्रीफळ वाढवून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.
यावेळी पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येत आहे. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आर्थिक बळ देण्याचे कार्य सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील सहा लाखांहून अधिक लाडक्या बहिणी या योजनांचा लाभ घेत आहेत. देश व राज्यातील विविध लोककल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले आहे. या विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजपा नेत्या जयश्री वहिनी पाटील, नेते पृथ्वीराज पवार तसेच हरिपूर–समडोळीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.