अजितदादा, जनतेचं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही, तुम्हाला निरोपासाठी लोटलेल्या जनसागराच्या डोळ्यांतले अश्रू त्याची मूक साक्ष देत होते – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांनी पुष्पचक्र अर्पण करून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, दुःखातून सावरणारे ‘दादा’च गेले…
पाटील यांनी आपल्या पोस्ट मध्ये पुढे लिहिले आहे कि, अजितदादा महाराष्ट्रासाठी खरोखर मोठ्या भावासारखे होते. त्यांना निरोप देण्यासाठी बारामतीत उसळलेला जनसागर, शोकसागर तेच सांगत होता. अजितदादा खरोखरच अजातशत्रू होते. सगळ्यांसाठी अजितदादा खरोखर दादा, मोठा भाऊच होते. निरोपासाठी आलेला प्रत्येक चेहरा मूकपणे तेच सांगत होता… दादांचं असणं आयुष्याचा भाग असलेल्यांसाठी दादांचं नसणं प्रचंड वेदनादायी असेल… अजितदादा, मोठा भाऊ गेल्याचं दुःख झालेल्या अनेकांना या दुःखातून सावरणं सोपं नाही!

अजितदादा नावाच्या परिसाचा स्पर्श न झालेलं कुणीच बारामतीत नसेल. बारामतीच नाही, महाराष्ट्रातही असंख्यांना या परिसाचा स्पर्श झाला. त्यामुळेच तर ते सगळ्या महाराष्ट्राचे लाडके दादा झाले. अजितदादांवर महाराष्ट्राच्या जनतेनं अलोट प्रेम केलं. अजितदादा, जनतेचं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. तुम्हाला निरोपासाठी लोटलेल्या जनसागराच्या डोळ्यांतले अश्रू त्याची मूक साक्ष देत होते.
अजितदादा, आज बारामतीत तुम्हाला पुष्पचक्र वाहिलं. निःशब्द झालो. काय बोलावं तेच सुचत नव्हतं. अजूनही नाहीये. एक मात्र नक्की, आयुष्यात आजवर अनेक कठीण, दुःखाचे प्रसंग आले. आजचा प्रसंग सर्वात कठीण प्रसंगांपैकी एक असेल… मोठा भाऊ गमावल्याचं दुःख पचवण्याची शक्ती तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या असंख्य भाऊ-बहिणींना, कार्यकर्त्यांना आणि तुमच्या कुटुंबीयांना मिळो, हीच परमेश्वराकडे पुन्हा एकदा प्रार्थना…भावपूर्ण श्रद्धांजली!, अशा दुःखद भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.
अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरजजी चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.
प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.