नांद्रेत ‘पंचकल्याणक’ महोत्सवाचा मंगलमय सोहळा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले जैन मुनींचे आशीर्वाद
सांगली : सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर परिसरात आयोजित ‘श्रीमत जिनेंद्र भगवान पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव २०२६’ आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पवित्र सोहळ्यात उपस्थित राहून जैन मुनींचे आशीर्वाद घेतले आणि धार्मिक विधींमध्ये सहभाग नोंदवला.
तीर्थंकर भगवंतांच्या गर्भकल्याणकापासून ते मोक्षकल्याणकापर्यंतच्या दिव्य प्रवासाचे दर्शन घडवणारा हा महोत्सव जैन समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “या मंगलमय सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे मनाला विलक्षण समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाली आहे. जैन धर्मातील अहिंसा आणि शांततेचा विचार समाजासाठी सदैव प्रेरणादायी आहे.
या सोहळ्याप्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजप नेते शेखर इनामदार आणि पृथ्वीराज पवार यांच्यासह जैन समाजातील हजारो श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांद्रे गावातील या भव्य धार्मिक आयोजनाने संपूर्ण सांगली जिल्ह्याचे वातावरण भक्तीमय झाले आहे.