कुंडलमध्ये पालकमंत्र्यांची तोफ धडाडली!… पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विजयाचा निर्धार
सांगली : जिल्हा परिषद कुंडल गट तसेच पंचायत समितीच्या कुंडल आणि बांबवडे गणातील भाजपा महायुतीच्या प्रचारार्थ आज कुंडल येथे भव्य पदयात्रा आणि जाहीर सभा पार पडली. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी पाटील म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे विकासाचे प्रतीक आहेत. त्यांनी भूमिपूजन केलेले प्रकल्प तेच पूर्णत्वास नेत लोकार्पण करतात, ही त्यांची कार्यपद्धती विकासाबद्दलची बांधिलकी दर्शवते. त्यांच्या पाठपुराव्यामुळे पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना मार्गी लागत आहेत. जागतिक स्तरावर भारताची आर्थिक ताकद वाढत असून, उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.
क्रांतिआग्रणी जी. डी. बापू लाड यांनी मांडलेला सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार मोदीजी गरीब कल्याण योजनांमधून प्रत्यक्षात उतरवत आहेत. ‘शेतकरी सन्मान योजने’तून सांगली जिल्ह्यातील ३,८६,१९६ शेतकऱ्यांना ₹१५२९ कोटींची मदत मिळाली असून पलूस तालुक्यातील ३८ हजार शेतकरी लाभार्थी आहेत.
राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून जिल्ह्यातील ६,९९,९७६ बहिणींना लाभ मिळाला असून पलूस तालुक्यातील ४०,६६१ बहिणी लाभार्थी आहेत. भाजपा महायुती सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मोदीजी आणि देवेंद्रजींचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी भाजपा नेते शरदभाऊ लाड, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, उमेदवार धनश्री लाड, शिवाजीनाना मगर-पाटील, कुलदीप एडके, योगेश लाड, संदीप पाटील, पोपट संकपाळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.