विकासाच्या मुद्द्यावर भाळवणीची वज्रमूठ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रंगला प्रचार सोहळा
सांगली : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे भाजपमय झाले आहे. जिल्हा परिषद भाळवणी गट आणि पंचायत समितीच्या भाळवणी व आळसंद गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज लेंगरे येथे भव्य चौक सभा उत्साहात संपन्न झाली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सभेला संबोधित केले.
या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे भाळवणी आणि आळसंद परिसरातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक आणि स्थानिक संघटनांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. या पाठिंब्यामुळे भाजपची बाजू अधिक भक्कम झाली असून विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सभेला संबोधित करताना पालकमंत्र्यांनी मतदार बांधवांशी थेट संवाद साधला आणि भाळवणी-आळसंद पट्ट्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले
यावेळी भाजपाचे नेते वैभव पाटील, दाजीबा पवार, संग्राम माने, अविनाश काथे, राजू जानकर, महेश खराडे, उत्तम कदम, सयाजी धनवडे तसेच जिल्हा परिषद भाळवणी गटाचे उमेदवार नितीनराजे जाधव, भाळवणी पंचायत समिती गणाचे उमेदवार मोहन धनवडे, आळसंद पंचायत समिती गणाचे उमेदवार आकाश माने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व भाळवणी-आळसंद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.