कडेगाव तालुक्यात महायुतीचा विजयाचा हुंकार; ‘यशवंत पंचायत राज’ पुरस्कार हा कामाची पावती – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

7

सांगली : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत आज कडेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कडेपूर व तडसर जिल्हा परिषद गट तसेच कडेपूर, हिंगणगाव बुद्रूक आणि शाळगाव पंचायत समिती गणातील भाजपा-महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ सावंतपूर येथे भव्य चौक सभा पार पडली. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सभेला संबोधित करताना विरोधकांवर निशाणा साधला आणि विकासाचा पाढा वाचला.

सभेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या पथावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामामुळे महाराष्ट्राला मिळालेला प्रथम क्रमांकाचा ‘यशवंत पंचायत राज पुरस्कार’ हा आपल्या पारदर्शक कार्यपद्धतीचा सन्मान आहे. आम्ही केवळ घोषणा केल्या नाहीत, तर ‘झिरो पेंडन्सी’ सारखे उपक्रम राबवून सर्वसामान्यांचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले आहेत.

भाजपा-महायुती ही केवळ राजकारण करणारी नसून काम करणारी माणसं आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. कडेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सभेला कडेगाव तालुक्यातील नागरिक आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपा नेते व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, उमेदवार शकुंतला पिंगळे, पूनम माळी, आशीष घार्गे, मंदाताई करंडे, विजय भोसले, प्रियंका पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.