दुष्काळी पट्ट्यातील बनाळी-येळवी परिसरासाठी म्हैशाळ विस्तारित योजना आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवणे हा भाजपाचा ठाम निर्धार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका जत तालुक्यात पोहोचला असून, आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बनाळी येथे विजयाचा विश्वास व्यक्त केला. बनाळी जिल्हा परिषद गट आणि येळवी पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत त्यांनी दुष्काळी भागासाठी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रचाराच्या प्रारंभी चंद्रकांत पाटील यांनी बनाळीचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बनशंकर देवाचे दर्शन घेतले. बनाळीच्या या पवित्र भूमीतून सुरू झालेला हा प्रचार विजयाकडे जाईल आणि जतच्या विकासासाठी श्री बनशंकराचा आशीर्वाद भाजपच्या पाठीशी राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली
पाटील यांनी यावेळी संबोधित करताना म्हटले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना थेट आधार मिळत आहे. दुष्काळी पट्ट्यातील बनाळी-येळवी परिसरासाठी म्हैशाळ विस्तारित योजना आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचवणे हा भाजपाचा ठाम निर्धार आहे. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उमेदवार सुनील पवार, मिलींद पाटील, विजय रुपनर तसेच भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.