संखमध्ये भाजपची मुसंडी! अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; जतमध्ये ‘कमळ’ फुलवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची साद
सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख जिल्हा परिषद गट व गिरगाव पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संख येथे जाहीर सभेत मतदारांशी संवाद साधला. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, जतच्या पूर्व भागातील संख, गिरगाव व जाडरबोबलाद परिसराला अनेक वर्षे भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मोदी-फडणवीस सरकारने विस्तारित योजनेसाठी ₹२००० कोटींपेक्षा अधिक निधी देत कामांना गती दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकरी सन्मान योजनेतून महिलां व शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळत आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसंध सत्ता असेल तर विकासाचा वेग अधिक वाढतो. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या प्रसंगी जतचे आमदार गोपीचंद पडळकर, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रविंद्र आरळी, आर. के. पाटील सर, महेश खराडे, जिल्हा परिषदेच्या संख गटाच्या उमेदवार कविता पाटील, संख पंचायत समिती गणाच्या भाजपा उमेदवार सदाशिव दर्गाकर, गिरगांव पंचायत समितीच्या उमेदवार रविकुमार बगली यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.