पर्यावरण रक्षणाचा ‘सांगली पॅटर्न’ आता जागतिक स्तरावर! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबई येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित होणाऱ्या ‘जागतिक पर्यावरण परिषदेत’ भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भिलवडीचे सुपुत्र ॲड. डॉ. तुशाल शिवाजी शिवशरण यांची निवड झाली आहे. जगातील सुमारे ६० देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असून, याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी डॉ. शिवशरण यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. शिवशरण यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील एका सुपुत्राने जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे, ही जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या परिषदेमुळे भारताच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, माजी मंत्री आणि आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.