सांगलीत राज्यस्तरीय कलोत्सवाची पर्वणी!…. १६ ते २२ फेब्रुवारीदरम्यान भरत असलेल्या या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली : दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन दि. १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “कलाविश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन, सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
याबाबत माहिती देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, ६५वे ‘महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन’ यंदा सांगली येथे होत असून, नवोदित कलाकारांच्या सर्जनशीलतेचा भव्य उत्सव रसिकांना पाहायला मिळणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच शालेय बालचित्रकारांनाही या मंचावर संधी देत तब्बल १,२७५ निवडक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत. १६ ते २२ फेब्रुवारीदरम्यान भरत असलेल्या या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या!, असे आवाहन देखील पाटील यांनी केले आहे.
दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दर वर्षी कला संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आयोजित केले जाते. महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन हे महाराष्ट्राच्या कला सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण वारसा आहे.
राज्य कला प्रदर्शनाच्या निमित्ताने दर वर्षी दृश्य कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंताचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. या वर्षी ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या दीर्घकालीन कलात्मक व शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात येत आहे. कला संचालनालयाच्या माध्यमातून शालेय स्तरावरील चिमुकल्या हातांना थेट राज्याच्या मुख्य कला प्रवाहात सामील करुन घेण्याचा क्रांतीकारक निर्णय पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. राज्याच्या कला क्षेत्रासाठी ही उल्लेखनीय बाब आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कला महाविद्यालयीन विद्यार्थी, कला शिक्षक आणि कला रसिक यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. सात दिवस चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.