‘श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ या भव्य प्रकल्पास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन घेतला आढावा
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारत असलेल्या ‘श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ या भव्य प्रकल्पास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, रा. स्व. संघाच्या विचारांतून प्रेरणा घेऊन समाजहितार्थ उभा राहत असलेला हा प्रकल्प आणि त्यातील ‘आर. के. दमानी मेडिकल कॉलेज’ पाहून मनस्वी आनंद झाला. सुमारे ३५ एकर परिसरात पसरलेल्या या प्रकल्पात आधुनिक प्रयोगशाळा, वातानुकूलित लेक्चर हॉल्स, डिजिटल लायब्ररी आणि मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल अशा जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सोयी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, रुग्णांच्या सेवेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी येथे १२०० पेक्षा जास्त खाटांचे सुसज्ज रुग्णालय देखील उभारले जात आहे.
या लोकोपयोगी प्रकल्पाच्या उभारणीच्या प्रवासात मला ‘खारीचा वाटा’ उचलता आला, याचे मला खूप समाधान आणि अभिमान वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक मोठे केंद्र बनेलच, पण त्यासोबतच विभागातील गरजू रुग्णांसाठी हा एक मोठा ‘आधारवड’ ठरेल, असा मला ठाम विश्वास असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.
या भेटीप्रसंगी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक अनिल भालेराव, मंत्री अतुल सावे, डॉ. अश्विनी कुमार तुपकरी, डॉ. अनंत पंढरे, डॉ. सतीश कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. स्वाती शिरोडकर यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित होते.