मैदान कोणतेही असो, महाराष्ट्राचा झेंडा नेहमीच अभिमानाने उंच फडकत राहतो! – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या ६९व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत देशात प्रथम स्थान पटकावले आहे. या ऐतिहासिक कामगिरीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनापासून कौतुक केले असून, हा विजय महाराष्ट्राच्या गौरवशाली क्रीडा परंपरेचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी या स्पर्धेत एकूण ५१८ पदकांची विक्रमी कमाई केली आहे. यामध्ये १८१ सुवर्ण, १५९ रौप्य आणि १७८ कांस्य पदकांचा समावेश आहे. प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने खेळत खेळाडूंनी ‘मराठी बाणा’ देशाला दाखवून दिला आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले. या यशाबद्दल खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक आणि खंबीरपणे पाठिशी उभे राहणाऱ्या पालकांचेही मंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
ही कामगिरी पाहून मन अभिमानाने भरून आले आहे. या विजयामागे आपल्या पुढच्या पिढीतील खेळाडूंचा घाम, त्यांचा अथक सराव आणि काहीतरी करून दाखवण्याची प्रबळ जिद्द आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मैदानात पाय रोवून उभा राहणारा ‘मराठी बाणा’ या खेळाडूंनी देशाला दाखवून दिला आहे. या यशाचे खरे शिल्पकार असणारे सर्व गुणवंत खेळाडू, त्यांना रात्रंदिवस पैलू पाडणारे त्यांचे मार्गदर्शक-प्रशिक्षक आणि आपल्या पाल्याच्या स्वप्नांसाठी खंबीरपणे उभे राहणारे पालक या सर्वांचे पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
हा विजय महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवीन ऊर्जा देणारा ठरेल, यात शंका नाही. आम्हाला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान आहे, असल्याचे पाटील यांनी म्हटले.