जवानांसोबत रंगांची उधळण! मंत्री चंद्रकांत पाटलांनी साजरी केली आगळीवेगळी होळी; देशसेवेला केलं वंदन
पुणे : होळी हा सण केवळ रंगांची उधळण नसून, तो मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमधील ओलावा जपण्याचा एक मंगलमयी सोहळा आहे. आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. याच भावनेतून, या सणाचा द्विगुणित आनंद पाटील यांनी त्यांच्या सीआयएसएफ (CISF) च्या शूर जवानांसोबत साजरा केला.

याबाबत पाटील यांनी म्हटले, देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि वेगवेगळ्या राज्यांतून आलेले हे जवान आज खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग बनले आहेत. आपल्या घरापासून मैलोन् मैल दूर राहून, सण-उत्सवांची पर्वा न करता आपली जबाबदारी चोख बजावणाऱ्या या ‘वर्दी’तील भावांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरून आले असल्याचे पाटील यांनी म्हटले.
यंदाची होळी माझ्या CISF च्या शूर जवानांसोबत साजरी करताना एक वेगळाच आनंद मिळाला असल्याचे देखील पाटील म्हणाले. त्यांच्या त्यागाला आणि देशसेवेला वंदन करत, पाटील यांनी उत्साहात हा सण साजरा केला.