भाजपकडून राज्यसभेचे ‘चार’ शिलेदार जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंना पुन्हा संधी, चंद्रकांत पाटलांकडून अभिनंदन

10

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या ७ जागांसाठी भाजपने आज आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांच्यासह 4 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्यसभा निवडणूक येत्या १६ मार्च रोजी होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील आपल्या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया चिंतामण ईवनाते या चार नावांची अधिकृत घोषणा भाजपाकडून करण्यात आली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

पाटील यांनी म्हटले कि, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील राज्यसभा द्विवार्षिक निवडणुकीसाठी विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया चिंतामण ईवनाते यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! या अनुभवी व अभ्यासू नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आणि राज्याच्या विकासाचे मुद्दे दिल्लीत अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा ठाम विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. तसेच पाटील यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देखील दिल्या.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, देशातील १० राज्यांमधील ३७ जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश आहे. उद्या म्हणजेच ५ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. ६ मार्चला अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर ९ मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. या निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी सकाळी ९:00 ते सायंकाळी ४ :00 पर्यंत मतदान पार पडणार असून संध्याकाळी ५:00 वाजेनंतर मतमोजणी केली जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.