अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता जर्मन-जपानी भाषेचे धडे; मुंबई विद्यापीठ आणि तंत्र शिक्षण मंडळात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक करार
मुंबई : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्यात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून जर्मन-जपानी भाषांचे प्रशिक्षण देण्याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे भाषा प्रशिक्षण, क्रेडिट्स व प्रमाणपत्र मिळण्यासोबतच परदेशातील रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
या करारानुसार, अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून जर्मन आणि जपानी भाषांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ.अजय भामरे व सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.