कोथरूडच्या शिवतीर्थावर शिवरायांचा जयघोष… श्रीमान योगी प्रतिष्ठान’च्या देखाव्याने वेधले मंत्री चंद्रकांत पाटलांचे लक्ष
पुणे : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड मतदारसंघाचे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील ‘शिवतीर्थावर’ जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले. शिवजयंतीच्या मंगल दिनी कोथरूड परिसरात शिवप्रेमींचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

श्रीमान योगी प्रतिष्ठान’च्या वतीने यावर्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीवर आधारित अत्यंत देखणा आणि प्रेरणादायी देखावा साकारण्यात आला होता. शिवरायांची ‘शक्ती’ आणि तुकोबांचा ‘भक्ती’ मार्ग यांचा हा अलोट संगम पाहून मंत्री पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. शिवतीर्थावर सकाळपासूनच शिवभक्तांची मांदियाळी होती. भगवे ध्वज आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
पाटील म्हणाले, आपला हा दैदिप्यमान वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दुष्यंत मोहोळ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेले कष्ट अतिशय कौतुकास्पद आहेत. शिवछत्रपतींचे विचार हेच आपल्या ऊर्जेचे खरे स्रोत आहेत. हीच ऊर्जा उराशी बाळगून आपण प्रगतीची वाटचाल करूया असे पाटील यांनी म्हटले.