ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीमचा थरार; पुण्यात मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत रंगला भव्य शिवजयंती उत्सव
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साने गुरुजी नगर येथे ‘हिंदू गर्जना प्रतिष्ठान’च्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
शिवजयंतीचा हा उत्साह आणि शिस्त खरोखरच कौतुकास्पद आहे. तरुण पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अशा भव्य उत्सवांतून अधिक प्रभावीपणे पोहोचतात. या आयोजनाबद्दल धीरज घाटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो,” असे प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात शिवकाळाचा जिवंत साक्षातकार घडवणारे दृश्य पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या निनादाने आणि लेझीमच्या थराराने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. धनगर समाजाचे पारंपरिक नृत्य हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या शिस्तबद्ध आणि भव्य नियोजनाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष कौतुक केले.
या मिरवणूक सोहळ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रभागातील राजेंद्र नगर गणपती मंदिरापासून मिरवणुकीची सुरुवात झाली. तेथून मांगीरबाबा मंदिर चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी नगर परिसर येथून ही मिरवणूक सणस मैदानाजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी, जय शिवाजी … अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीमध्ये महिलांचा सहभागी लक्षणीय होता.