कोथरूडमध्ये ‘सखी सुखदा’च्या वतीने गरोदर मातांसाठी ‘आनंदोत्सव’; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून शुभेच्छा

7

पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त कोथरूडमध्ये ‘सखी सुखदा वेल्फेअर फाऊंडेशन’ तर्फे आयोजित ‘आनंदोत्सव’ सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावून महिलांना शुभेच्छा दिल्या.

‘सखी सुखदा’ उपक्रमांतर्गत कोथरूडमधील वस्ती भागातील गरोदर मातांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. वस्ती भागातील महिलांचे बाळंतपण सुरक्षित व्हावे आणि त्यांना योग्य वैद्यकीय सोयी मिळाव्यात, यासाठी हे फाउंडेशन कटिबद्ध आहे. हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात असून, सुदृढ आणि सशक्त समाज घडवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सखी सुखदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही लोकसहभागातून कोथरूडमधील वस्ती भागातील गरोदर मातांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहोत. वस्ती भागातील आपल्या लेकींचे बाळंतपण सुरक्षितपणे पार पडावे आणि त्यांच्या आरोग्याची योग्य जबाबदारी घेतली जावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या विधायक उपक्रमाचा भाग होता आले, हे मी माझे भाग्य समजतो, असेही पाटील यांनी म्हटले. एक सुदृढ, सशक्त आणि सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आमचा हा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी अधोरेखित केले.

या प्रसंगी सखी सुखदा वेल्फेअर फाऊंडेशनच्या स्मिता पाटील, नगरसेविका मनिषा बुटाला, माजी नगरसेविका छाया मारणे, सुरेखा जगताप, स्वाती मोहोळ यांच्यासह कोथरूडमधील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.