कोथरुडमध्ये महिला उद्योजिकांच्या पंखांना मिळणार बळ! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून ‘भव्य प्रदर्शन व विक्री’चे आयोजन
पुणे: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्यातील सुप्त कौशल्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये एका विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘उत्कर्ष अभियान’ आणि ‘उन्नती’ यांच्या माध्यमातून महिला दिनाचे आणि गुढीपाडव्याचे औचित्य साधून महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या वस्तूंचे ‘भव्य प्रदर्शन व विक्री’ आयोजित करण्यात आली आहे.
कोथरुड मतदारसंघातील भगिनींना स्वावलंबी बनवण्यासाठी उचललेले हे पाऊल स्थानिक महिलांसाठी मोठी संधी ठरणार आहे. या प्रदर्शनात घरगुती उत्पादने, हस्तकला, खाद्यपदार्थ आणि विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत.
या उपक्रमाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आपल्या भगिनींच्या कौशल्याला दाद देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी हे एक छोटेसे पाऊल असून, नागरिकांनी या प्रदर्शनास मोठ्या संख्येने भेट देऊन महिला उद्योजिकांचा उत्साह वाढवावा.”
कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: रविवार, १५ मार्च २०२६
स्थळ: गांधी भवन मैदान, कोथरुड, पुणे.
वेळ: सकाळी ८:०० ते रात्री ८:०० वाजेपर्यंत
कोथरुडमधील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या प्रदर्शनाला भेट देऊन महिला सक्षमीकरणाच्या या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.