केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची केली विचारपूस
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कोल्हापुरात कुस्ती खेळताना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे त्यांची कुस्ती सुटली होती. मात्र, राजकीय आणि सामाजिक कामाच्या व्यापात या जुन्या दुखापतीकडे दुर्लक्ष झाले. अलीकडे हा त्रास असह्य झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या डॉक्टरांनी त्यांना महिनाभर सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेतृत्व या अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाही, याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी खंत व्यक्त केली. “मुरलीधर अण्णांसारखे तरुण नेतृत्व संसदेत हवे होते, पण प्रकृतीला प्राधान्य देणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे पाटील यावेळी म्हणाले.
या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केवळ मुरलीधर मोहोळ यांनाच नव्हे, तर राजकारणातील सर्व तरुण सहकाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “आपले जनसेवेचे व्रत पुढे नेण्यासाठी स्वतः तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. कोणत्याही दुखण्या-खुपण्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच उपचार घ्या.”
मुरलीधर अण्णा लवकरच पूर्णपणे ठणठणीत बरे होऊन पुन्हा जोमाने जनतेच्या सेवेसाठी कार्यरत होतील, अशी प्रार्थनाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.