पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ एक्स्पोचा उत्साह; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर
पुणे : पुण्यातील कृषी महाविद्यालय मैदान येथे आयोजित गौ-टेक (Gau Tech) २०२६ एक्स्पोला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. देशी गोवंश संवर्धन, सेंद्रिय शेती, पंचगव्य आणि गो-आधारित उद्योगांना चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली.

यावेळी पाटील यांनी म्हटले, ‘गौ ज्ञान – विज्ञानापासून वैश्विक व्यवसायापर्यंत’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून, गाईंच्या वैज्ञानिक वापरातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. असे उपक्रम राज्याच्या इतरही भागात राबवले जाणे आवश्यक आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
२० मार्च ते २३ मार्च २०२६ या कालावधीत, दररोज सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत, कृषी महाविद्यालय मैदान , शिवाजीनगर, पुणे येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात आले आहेत, जे गो-आधारित उद्योगांमधील विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
यावेळी राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि एक्स्पोचे आयोजक शेखर मुंदडा यांच्यासह ग्लोबल कंफेडरेशन ऑफ काऊ-बेस्ड इंडस्ट्रीजचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.