कोथरूडमधील ‘मानसी’ प्रकल्पाचा विस्तार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते माहितीपुस्तिका व संकेतस्थळाचे लोकार्पण
पुणे : कोथरूडमधील वस्तीभागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मानसी’ प्रकल्पाचा आता विस्तार झाला आहे. या प्रेरणादायी उपक्रमाच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन आणि संकेतस्थळाचे (Website) लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
एका छोट्या रोपट्यापासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा आज वटवृक्ष होताना पाहून मनस्वी आनंद होत आहे, अशा भावना मंत्री पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. याच प्रसंगी ‘मानसी-प्रेरणा फाऊंडेशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मुग्धा भागवत यांची निवड करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रकल्पाची यशोगाथा आता माहितीपुस्तिकेसह संकेतस्थळाच्या माध्यमातून जगासमोर येणार आहे, ज्यामुळे अधिक मुलींना याचा लाभ घेता येईल. आपल्या लेकींच्या प्रगतीचा हा यज्ञ असाच तेवत राहो, अशी सदिच्छा व्यक्त करत त्यांनी या प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक केले.
मानसी-प्रेरणा फाऊंडेशन ही पुणेस्थित एक सामाजिक संस्था आहे, जी प्रामुख्याने वस्तीभागातील मुलींच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करते. वस्तीभागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कौशल्यांचा विकास करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘मानसी’ प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात.