कोंढापुरी ‘के.ई.एम.’ रुग्णालयाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा; शासनाकडून जमीन हस्तांतरित, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मानले आभार
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोंढापुरी आणि परिसरातील ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोंढापुरी येथील ‘के.ई.एम. रुग्णालय’ विस्तारासाठी ०.८१ आर जमीन हस्तांतरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून, यामुळे या भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही जमीन विशेष बाब म्हणून ‘महसूलमुक्त’ आणि ‘भोगवटामूल्यरहित’ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाला वेळेवर आणि उत्तम उपचार मिळावेत, या उद्देशाने हा जनहितैषी निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून, या निर्णयामुळे कोंढापुरी परिसरातील हजारो नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येईल, असे पाटील यांनी यावेळी नमूद केले. या विस्तारीकरणामुळे रुग्णालयाची क्षमता वाढणार असून, आपत्कालीन स्थितीत ग्रामीण रुग्णांना पुण्याला धाव घेण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.