कोथरूड आणि तुळशीबाग राम मंदिरात रामजन्मोत्सवाचा जल्लोष; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन
पुणे : प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा उत्साह संपूर्ण पुणे शहरात पाहायला मिळाला. कोथरूड परिसरातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या राम जन्मोत्सव सोहळ्यांमध्ये राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष सहभागी होत भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना रामनवमीच्या मंगलमयी शुभेच्छा दिल्या.
कोथरूडमधील कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “प्रभू श्रीरामांचे जीवन हे आदर्श, नैतिकता आणि कर्तव्यभावनेचे प्रतीक आहे. त्यांच्या या महान आदर्शांनी प्रेरित होऊन समाजात सद्भावना आणि मूल्ये अधिक वृद्धिंगत व्हावीत, हीच प्रभू चरणी प्रार्थना आहे.

कोथरूड येथील सोहळ्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांचे मुख्य श्रद्धास्थान असलेल्या तुळशीबाग येथील ऐतिहासिक राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रभू रामरायाची आरती केली आणि सर्व भाविकांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी लाभो, अशी कामना केली. या मंगल प्रसंगी मंदिराचे विश्वस्त आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. पुणे शहर आणि परिसरात ठिकठिकाणी झालेल्या या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण वातावरण राममय झाले होते.