पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देऊ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

9

सांगली  : पोलीस दलाच्या सात कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून ४ कोटी ३४ लाख १६ हजार १९३ रूपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापुढेही पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ च्या निधीतून मंजूर सांगली जिल्हा पोलीस दलाकडील विविध विकासकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, कायदा व सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी पोलीस दलाला पायाभूत सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान व वाहने उपलब्ध करून देऊ. मुंबईत शासकीय व खाजगी सीसीटीव्ही असे एकत्र जाळे करण्यात येत असून, त्यामुळे गुन्हेउकल करण्यास मदत होणार आहे. सांगली जिल्ह्यातही ब्लॅक स्पॉटस्‌च्या ठिकाणी वीजव्यवस्था, सीसीटीव्ही व्यवस्था, अतिक्रमण हटाव यासाठी महानगरपालिका व जिल्हा वार्षिक योजनेच्या एकत्रित निधीतून कार्यवाही करावी, असे त्यांनी सूचित केले.

पाटील पुढे म्हणाले, कालानुरूप अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरातून २४ तासात गुन्हेउकल व दोषसिद्धीच्या अनुषंगाने पोलीस दल चांगले काम करत आहे. मात्र, कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी अधिक कडक उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने गस्त वाढवावी. विविध पथकांनी कायद्याची दहशत निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर स्थापत्य स्वरूपाच्या कामे ठेकेदारांनी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करावीत, असे सांगताना वांद्र्यातील उच्च न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांच्या निवासस्थानाचे तसेच, कोल्हापूर येथील पोलिसांच्या निवासस्थानाचे उदाहरण दिले.

प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भूमिपूजन झालेल्या कामांची सविस्तर माहिती, त्यांची गरज व त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. तसेच, यातून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यास मदत होणार असून, दोषसिद्धी वाढून गुन्हेगारीस आळा बसेल, असे ते म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील व मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज भूमिपूजन झालेली कामे व त्यासाठी प्रशासकीय मान्यता रक्कम अनुक्रमे पुढीलप्रमाणे –

१) पोलीस मुख्यालय येथे ट्रॅफीक पार्कची दुरुस्ती व विस्तारीकरण करणे – रू. 41,48000.

२) पोलीस मुख्यालय सांगली नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे – रू. 3639760.

३) पोलीस मुख्यालय सांगली वाहतूक शाखे समोरील संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे – रू. 36,39,760.

४) पोलीस मुख्यालय येथे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय यांचे करीता टाईप 4 पध्दतीचे निवासस्थान बांधकाम करणे – रू. 96,45,975.

५) पोलीस मुख्यालय येथे पोलीस उपअधीक्षक शहर विभाग सांगली यांचे करिता टाईप 4 पध्दतीचे निवासस्थान बांधकाम करणे – रू. 96,45,975.

६) पोलीस मुख्यालय मोटार परिवहन विभाग येथे वाहनांचे पार्किंगकरिता शेड बांधकाम करणे – रू. 51,72,723.

७) पोलीस मुख्यालय येथे परेडकरिता किल्ला भिंतीचे बांधकाम करणे – रू. 75,24,000.

Get real time updates directly on you device, subscribe now.