शिक्षण आणि संस्कारांचा नवा अध्याय: एमआयटी ठाणे संकुलाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
मुंबई : शिक्षण क्षेत्रात ४३ वर्षांहून अधिक काळ ‘ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार’ ही त्रिसूत्री जपणा-या एमआयटी (MIT) पुणे या अग्रगण्य संस्थेच्या ठाण्यातील ‘MAEER’s MIT’ या नूतन शैक्षणिक संकुलाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोमवारी ३० मार्च २६ रोजी मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले.

यावेळी पाटील यांनी म्हटले, मुंबई आणि ठाणे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे संकुल आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे एक नवे केंद्र ठरेल. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा मेळ घालत, इथून जागतिक दर्जाचे अभियंते आणि जबाबदार नागरिक घडावेत, अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच एमआयटी परिवाराचे अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र मेहता, महापौर सौ. डिंपल मेहता, डॉ. मंगेश कराड, डॉ. राहुल कराड, प्रा. ज्योती कराड-ढाकणे व इतर मान्यवर उपस्थित होते.