समृद्धी महामार्गावर जालन्याजवळ भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर
जालना : समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्याजवळ झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात ८ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघातामुळे संपूर्ण राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने मदतकार्य राबवले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
जालना नजीक घडलेला हा अपघात अत्यंत वेदनादायी आहे. मृत पावलेल्या नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या अपघातातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कठीण प्रसंगी सरकार मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे देखील पाटील म्हणाले.
कडवंची गावाकडून जालना शहराकडे येणाऱ्या मजुरांच्या पिक अपला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या महिला समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत होत्या. काम आटोपून या महिला पिकअप व्हॅनमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, आठ महिलांनी जागेवरच प्राण सोडला.