पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली सांगलीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट
सांगली: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सांगली दौऱ्यादरम्यान भाजपच्या दिवंगत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी शोकग्रस्तांना धीर देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय जनता पार्टी, सांगलीचे माजी नगरसेवक महेश नामदेव शिंगारे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. पालकमंत्री पाटील यांनी शिंगारे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. “महेश शिंगारे यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्व शिंगारे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
भाजपचे सांगली जिल्ह्याचे माजी शहराध्यक्ष हणमंत पवार यांचे वडील रघुनाथ पवार यांचे नुकतेच निधन झाले. पाटील यांनी पवार कुटुंबियांची भेट घेऊन कै. बाबांना (रघुनाथ पवार) श्रद्धांजली वाहिली. पवार कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात सहभागी होऊन त्यांनी मृतात्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना केली.
या सांत्वनपर भेटींदरम्यान सांगलीतील भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.