पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी मेट्रोचे जाळे अधिक विस्तारणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर आणि वारजे परिसराला जोडणाऱ्या मेट्रो ४ आणि ४ ए प्रकल्पाच्या प्रस्तावित आराखड्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पाची सविस्तर माहिती स्थानिक नागरिकांना मिळावी यासाठी पुणे मेट्रोच्या वतीने आयोजित सादरीकरण कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, २०१६ साली जेव्हा पुण्यात मेट्रोचे आगमन झाले, तेव्हा अनेक जण याकडे एक ‘दिवास्वप्न’ म्हणून पाहत होते; पण आज त्याच मेट्रोने पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलला असून ती जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. या प्रवासात आता कोथरुडचा हा नवा टप्पा मैलाचा दगड ठरेल.
याप्रसंगी बोलताना पाटील यांनी हिंजवडी मेट्रो मार्गिका लवकरात लवकर पूर्ण व्हावी, ही आग्रही मागणी देखील मेट्रो प्रशासनाकडे व्यक्त केली. मेट्रो ४ आणि ४ ए हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कोथरुडकरांचा वेळ आणि पैसा वाचण्यासोबतच वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असा मला ठाम विश्वास वाटत असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
या कार्यक्रमाला पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, नगरसेवक राजाभाऊ बराटे, पुनीत जोशी, नगरसेविका मंजुषा खर्डेकर, रेश्मा बराटे, तेजश्री पवळे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, शिवरामपंत मेंगडे आणि कोथरुडचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.