माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन… एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आणि जनसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा लोकप्रतिनिधी आपण गमावला – मंत्री चंद्रकांत पाटील

7

लातूर : लातूर पॅटर्नला राज्यभरात ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केवळ लातूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजकीय क्षेत्रातून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील डॉ. गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाटील यांनी म्हटले कि, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि भाजपाचे माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ आणि जनसामान्यांचे प्रश्न हिरिरीने मांडणारा लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना पाटील यांनी व्यक्त केल्या.

शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी दिलेले योगदान अतिशय मोठे होते. वैद्यकीय सेवांमुळे त्यांना लोक ‘देवमाणूस‘ म्हणायचे. त्यांच्या शिक्षण संस्थेमुळे लातूरला राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक ओळख प्राप्त झाली. बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी लातूरमध्ये दीर्घकाळ सेवा दिली. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे लोक त्यांना ‘देवमाणूस’ म्हणून ओळखू लागले. हे शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये शिक्षणाची भक्कम पायाभरणी झाली आणि त्यातूनच पुढे ‘लातूर पॅटर्न’ उदयास आला. मराठवाड्यात भारतीय जनता पार्टी चा पाया मजबूत करण्यात त्यांची भूमिका मोठी होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.